पुणे - व्यावसायिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यातील टोळीला भोसरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 38 लाख रुपयांचे 64 टन स्टील जप्त केले आहे.
या प्रकरणी दिपक किशोरीलाल गुजराल (वय-32) आणि विजयकुमार हरिराम विश्वकर्मा (वय-45) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार अद्याप फरार असून त्यांचा शोध भोसरी पोलीस घेत आहेत.
संबंधित आरोपींवर रायपूर छत्तीसगड, इंदोर मध्य प्रदेश, मुंबई, तेलंगणा राज्यात गुन्हे दाखल आहेत. भोसरी परिसरातील स्टीलचे व्यापारी परशुराम भोसुरी यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी आणि फरार असलेले हरीश राजपूत आणि सागर पारेख हे इंडिया मार्ट या ऑनलाईन वेबसाईट वरून स्टीलचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधत. तर विजय विश्वकर्मा याचे नावे असलेल्या विश्वकर्मा ब्रदर्स या फर्मचे नाव व कागदपत्रे वापरायचे. पुढील तारखेचा बनावट चेक देवुन आरोपी स्टील खरेदी करत. ते बंद असलेली कंपनी स्वतः ची भासवून कंपनीच्या समोर स्टील खाली करून घेत असत. तिथून सर्व जण गेल्यानंतर ते स्टील घेऊन इतरांना विकायचे. असे भोसरी पोलिसांनी सांगितले आहे. ज्या व्यावसायिकाकडून स्टील घेतले आहे, त्यास पैसे न देता त्यांची आर्थिक फसवणुक करत असत, असे पोलीस तपासात समोर आले आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलासे, पोलीस उप निरिक्षक गाढवे, पोलीस कर्मचारी अजय डगळे, बाळासाहेब विधाते, सागर भोसले, सागर जाधव, गणेश हिंगे, समिर रासकर, संतोष महाडीक, सुमित देवकर यांच्या पथकाने केली आहे.