पुणे : Ganesh Festival: ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि... असे अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर, महिलांनी केलेला शंखनाद आणि मोरया मोरयाच्या जयघोषानं मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात (Pune Ganeshotsav) ३१ हजार महिलांनी सामूदायिकरित्या अथर्वशीर्षाचं पठण (Atharvashirsha Pathan) केलं. ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर (Dagdusheth Ganpati) झालेल्या मंत्रोच्चारानं वातावरण मंगलमय झालं होतं.
३१ हजार महिलांनी केलं अथर्वशीर्ष पठण : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, (Dagdusheth Ganpati Mandal Trust) सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे ३१ हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण करण्यात आलं. गणेश नामाचा जयघोष करत महिलांनी पहाटेच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. पुण्याचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, ट्रस्टचे विश्वस्त व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. रशिया येथून आलेल्या परदेशी भक्तांनी देखील यावेळी सहभाग घेतला. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचं यंदा ३६ वं वर्ष होतं.
पहाटेपासूनच उत्सव मंडपासमोर गर्दी : महिलांनी शंखनाद केल्यानंतर 'ॐकार जप' आणि मुख्य 'अथर्वशीर्ष पठण' करत गणरायाला नमन केले. तसेच हात उंचावून टाळ्यांचा गजर करत महिलांनी गणरायाला अभिवादन केलं. पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती. उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकापर्यंतचा परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगेनं भरुन गेला होता.
विविध देशातील पर्यटकांनी पठणाकरीता लावली हजेरी : पुण्याचा गणेशोत्सव आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगात आहे. त्यामुळे दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासोबतच अथर्वशीर्ष पठणाच्या सोहळ्याला फ्रान्स, इस्त्राईल, इटली, मॅस्कीको, पोलंड, तुर्कीसह विविध देशातील ३० हून अधिक परदेशी पर्यटकांनी पठणासाठी हजेरी लावली होती. यावेळी सहभाग घेत पाहुण्यांनी गणपतीचं दर्शन घेण्यासोबतच हा सोहळा आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपला.
हेही वाचा -
- Dagdusheth Ganpati Procession: 'दगडूशेठ' गणपतीची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना, पाहा व्हिडिओ
- Ganesh Festival 2023 : पुण्यात गणेशोत्सवाचा जल्लोष; ढोल ताशांचा गजर करत बाप्पाचं दिमाखात आगमन... पहा व्हिडिओ
- Ganesh Festival 2023 : पुण्यातील दगडूशेठ गणपतीसमोर अयोध्येतील राम मंदिराची साकारणार प्रतिकृती