पुणे - पुण्यातल्या एका तरुणाला काँग्रेसचा अध्यक्ष व्हायचे आहे. यासाठी त्याने संपूर्ण तयारी केली असून उद्या (मंगळवारी) तो काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व घेणार आहे. तसेच त्यानंतर लगेच पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे आणि जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्याकडे अध्यक्षपदासाठी अर्ज देणार आहे.
गजानंद चंद्रकांत होसाळे (वय 28) असे या तरुणाचे नाव आहे. तो कर्नाटकातील बिदर येथील आहे. इंजिनिअरिंगपर्यंत त्याचे शिक्षण झाले आहे. सध्या तो भोसरीतील एका कंपनीत काम करतो. माझी आणि काँग्रेसची विचारसरणी जुळते, त्यामुळे अध्यक्षपदासाठी अर्ज करणार असल्याचे त्या तरुणाने सांगितले.
अध्यक्ष हेच पद का हवे? असे विचारले असता, तो म्हणाला नेता किंवा कार्यकर्ता होऊन बदल घडवले अशक्य आहे. मात्र, अध्यक्ष झाल्यानंतर बदल घडवणे शक्य आहे. नेता किंवा कार्यकर्ता झाल्यास माझ्या कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणता येणार नाही. मात्र, अध्यक्ष झाल्या माझ्या कल्पना पक्षाच्या माध्यमातून अंमलात आणू शकतो. अध्यक्ष बनल्यानंतर काँग्रेसला नक्कीच चांगले दिवस येतील, त्यामुळे मला अध्यक्ष बनायचे असल्याचे त्या तरुणाने सांगितले.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. देशभरात काँग्रेसचे फक्त ५२ खासदार निवडून आले. या पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, एक महिना होऊन देखील काँग्रेसला अध्यक्षपद स्विकारणारी व्यक्ती मिळाली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेसची अशी दयनीय अवस्था बघूनच अध्यक्षपद स्विकारण्याचा निर्यण घेतला असल्याचे गजानंद यानी सांगितले. माक्ष, आता काँग्रेस त्याच्या अर्जाची दखल घेईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.