पुणे - केवळ तंबाखू दिली नाही, याचा राग आल्याने एकाने मित्राच्या डोक्यातच वीट घालून त्याची हत्या केली. ही घटना जेजुरी गावाच्या हद्दीतील भालेराव वस्ती याठिकाणी सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. सागर बापू शिंदे (वय 29) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार देवेंद्र खाडे यांनी तक्रार दिली असून आरोपी दत्ता दिगंबर ठोंबरे याला जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत आणि आरोपी जेजुरीतील भालेराव वस्ती या ठिकाणी राहण्यास आहेत. ते एकमेकांचे चांगले मित्र असून मोलमजुरी करून उपजीविका भागवितात. मजुरीही एकत्र करतात आणि रोज सायंकाळी ही एकत्रच बसतात. सोमवारी सायंकाळी ही ते एकत्र बसले होते. यावेळी आरोपी दत्ता ठोंबरे याने मयत सागर शिंदे यांच्याकडे तंबाखूची मागणी केली. परंतु, सागर शिंदे याने तंबाखू देण्यास नकार दिला.
हेही वाचा - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली सोनपेठच्या निळा शिवारात बाधित शेताची पाहणी
यावेळी दत्ता ठोंबरे याने 'माझी तंबाखू रोज खातोस आणि आज मला का देत नाहीस' असे म्हणत सागर शिंदे याच्याशी वाद घातला आणि रागाच्या भरात जवळच पडलेली वीट त्याच्या डोक्यात मारली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने सागरचा मृत्यू झाला. जेजुरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश माने करीत आहेत.