पुणे - मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे, यासाठी पुण्यातील गोखलेनगर परिसरातील आकांक्षा फाउंडेशनने एक अभिनव उपक्रम आयोजित केला आहे. मतदान केल्याची बोटावरील शाई दाखवा आणि रक्तगट व मधुमेह तपासणी विनामूल्य करा, असा उपक्रम फाउंडेशनने सुरू केला आहे.
मतदारांनी मतदान करुन देशाला चांगले आणि स्थिर सरकार द्यावे, याकरिता अनेक सामाजिक व सेवाभावी संस्था कार्यरत असतात. त्याचप्रमाणे गोखलेनगर परिसरातील आकांक्षा फाउंडेशनद्वारे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे जास्तीत जास्त मतदारांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे, असे फाउंडेशनकडून सांगण्यात आले आहे.
मंगळवार, दिनांक २३ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत वैष्णवी डायग्नोस्टिक सेंटर, गोखलेनगर येथे हा उपक्रम दिवसभर सुरू राहणार आहे. तरी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करुन या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन फाउंडेशनच्या डॉ. अपर्णा गोसावी आणि डॉ. आकांक्षा गोसावी यांनी केले आहे.