पुणे - अध्यात्मिक गुरु अम्मा भगवान यांच्या सेवकांनी होम-हवन आणि दर्शनसाठी करोडो रुपये लुटले. तसेच ही लूटमार उघड करणाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप भक्तांनी केला आहे. याबाबत तीन सेवकांसह एका दलालावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात जादुटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली आहे.
अम्मा भगवान यांचा चेन्नई आणि आंध्र प्रदेशला आश्रम आहे. जगभरात त्यांचा मोठा भक्त परिवार असून मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक भाविक आहेत. मात्र, या भाविकांना सेवकांकडून लुटले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात हजारो भाविकांची फसवणूक झाली असून भीतीपोटी अनेकजण पुढे येत नसल्याचा दावा आरोप केलेल्या भक्तांनी केला आहे. अम्मा भगवान यांनी 2012 साली भाविकांना व्हिडिओ मॅसेजव्दारे मंदिरासाठी देणगी नको असल्याचे आवाहन केले आहे. मात्र, त्यांच्याच सेवकांकडून मोठ्या प्रमाणात होम हवनसाठी तगादा लावला जात आहे.
काय आहे आरोप -
अम्मा भगवान यांच्या नावाने होम-हवनसाठी वर्षाला २ लाख तसेच दर्शनासाठी ५ लाख रुपये घेतले जात आहेत, असा आरोप भक्तांनी केला आहे. होम-हवन आणि दर्शनाच्या नावाखाली हजारो भक्तांची फसवणूक झाली असल्याचा दावा पीडित भक्तांकडून करण्यात येत आहे. एवढेच नाही तर गोल्डन बॉलसाठी राज्यातून 650 किलो सोने गोळा करण्यात आला असल्याचा दावा भक्तांनी केला आहे.