पुणे - आंबेगाव तालुक्यातील शिनोली गावात कांदा काढण्यासाठी आलेल्या मजुरांच्या मुलांनी शेताच्याकडेला असणाऱ्या धोतरा वनस्पतीच्या बिया खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विषबाधा झालेल्या मुलांना उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अरुण झाटे (वय ६), आचल झाटे (वय ८), शुभांगी देवकर (वय ५), दर्शना ठाकरे (वय ८) अशी विषबाधा झालेल्या मुलांची नावे आहेत.
कांद्याची काढणी सुरू असताना आंबेगाव तालुक्यात मजूर उपलब्ध होत नसल्याने अकोले येथून मजूर उपलब्ध करून त्यांच्याकडून कांदा काढणी सुरू होती. या मजुरांच्या कुटुंबासमवेत लहान मुलेही या शेताच्या ठिकाणी आली होती. काल दुपारच्या सुमारास शेताच्या बाजूला असणाऱ्या धोतऱ्याच्या बिया या मुलांनी खाल्ल्या त्यानंतर मुलांना उलट्या सुरू झाल्या. यानंतर तत्काळ प्रथमोपचारासाठी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी विषबाधा झाल्याचे समोर आले. मात्र, चारही मुलांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.