पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या चौघांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्या कडून 38 लाख रुपयांचा गुटखा, एक टेम्पो आणि कार, असा एकूण 56 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. हे सर्व आरोपी मुंबईचे रहिवासी असून त्यांच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाने तक्रार नोंदवली आहे. जनार्दन शंभू भारती (वय- 28), सुनीलकुमार गौरीशंकर तिवारी (वय-37), जियारुलखान रशीद खान समा (वय-32), धरमशंकर दुर्गाचरण गुप्ता (वय- 36), अशी या आरोपींची नावे आहेत.
गस्त घालत असताना वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सचिन नरुटे यांना ताथवडे येथून अवैध गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी हॉटेल स्टे-इन समोर सापळा लावून संशयित टेम्पो आणि इनोव्हा मोटार थांबवून तपासणी केली. टेम्पोमध्ये गुटख्याची 29 पोती तर इनोव्हा मोटारीत 1 पोते आढळून आले. टेम्पो आणि मोटार दोन्ही वाकड पोलीस ठाण्यात आणण्यात आली. नंतर अन्न आणि औषध प्रशासनाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी आरोपींविरोधात तक्रार दिली. त्यानुसार संबंधित आरोपीं विरोधात वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी विजय गंभीरे, विक्रम कुदळ, सचिन नरुटे, प्रशांत गिलबिले, विक्रम जगदाळे, बापूसाहेब धुमाळ, बाबजन इनामदार, जावेद पठाण, प्रमोद कदम, दीपक भोसले, शाम बाबा, तात्या शिंदे नितीन गेंगजे यांनी केली.