पुणे - हस्तिदंत विक्रीसाठी आलेल्या चौघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (२६ जून) करण्यात आली. त्यांच्याकडून साडेतीन कोटी रुपये किंमतीचे दोन हस्तिदंत जप्त करण्यात आले आहे.
आदित्य संदीप खांडगे (वय १९ वर्षे), ऋषिकेश हरिश्चंद्र गायकवाड (वय २८ वर्षे), अनिकेत चंद्रकांत अष्टेकर (वय २६ वर्षे) आणि अमित अशोक पिस्का (वय २८ वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पू.ल.देशपांडे गार्डन जवळ ४ व्यक्ती हस्तिदंत विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस कर्मचारी फुलपगारे, घोटकुले आणि इतर कर्मचाऱ्यांनी वनविभागाला याची माहिती कळवली. त्यानंतर पू.ल.देशपांडे गार्डन जवळील बसथांब्याजवळून चौघांना ताब्यात घेतले.
त्यातील एकाजवळ असलेल्या बॅगेमध्ये पोलिसांना ३३ आणि ३५ सेंटीमीटर लांबीचे दोन हस्तिदंत आढळले. हे हस्तिदंत बाळगण्याचा वनविभागाचा कायदेशीर परवाना आहे का? असे विचारता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर पोलिसांनी या चौघांवरही वन्य प्राणी संरक्षण कायदा १९७२ च्या कलम ९, ४४, ४९ (ब), ५२ अन्वये गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ करत आहेत.