पुणे- अत्यावश्यक सेवांची ने-आण करणारी वाहने हे गैरफायदा घेत असून प्रवासी वाहतूक करत असल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडत असून यावर निर्बंध आणणे गरजेचे आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान टेम्पो पकडला आहे. त्यात 7 लहान मुलांसह एकूण ४६ प्रवासी आढळून आले. हे सर्व कामगार असून त्यांना कर्नाटकमधील बेळगाव येथे जायचे होते. मुंबईतील सांताक्रूझ येथून हे सर्व कामगार टेम्पोमध्ये बसले होते.
अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी मालक आणि चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदयाल पांडे असे चालकाचे नाव असून संतोष पांडे असे टेम्पो मालकाचे नाव आहे. यातील मालक संतोष पांडे हे अत्यावश्यक सेवा असलेल्या किराणा दुकानाचा माल आणण्यासाठी टेम्पो चालकासह सोलापूर येथे जात होते. मुंबई येथून ते निघाले असता सांताक्रूझ येथे ४६ कामगार थांबले होते. त्यांना प्रवासी म्हणून टेम्पोमध्ये घेतले आणि प्रवाश्यांकडून काही रक्कम घेतली.
हेही वाचा-रातोरात पलायनाचा प्रयत्न फसला; उत्तर प्रदेशच्या 64 कामगारांचा टेम्पो मुंबईच्या वेशीवर 'लॉकडाऊन'
टेम्पो वाकडमार्गे जात असताना पोलिसांनी पकडले. टेम्पोला पाठीमागून ताडपत्री बांधलेली होती. टेम्पोतून प्रवास करणारे सर्व कामगार टेम्पोच्या आत बसलेले होते. यामध्ये ७ लहान मुलांचा समावेश आहे.
टेम्पोचालक आणि मालक यांच्यावर वाकड पोलिसांकडून कलम १८८, राष्ट्रीय आपत्ती कायदा आणि महाराष्ट्र कोरोना अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी यांच्या पथकाने केली आहे. मात्र,अत्यावश्यक सेवा असलेल्या टेम्पोमधूनच अशी प्रवासी वाहतूक केली जात आहे.त्यांच्यावर निर्बंध आणणे गरजेचे आहे.