पुणे - मालदीवमध्ये बॉम्ब स्फोटप्रकरणी खटला भरण्यात आलेले मालदीवचे माजी उपराष्ट्रपती अहमद अदीब यांना वैद्यकीय उपचारांसाठी पुण्यातील एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. अहमद अदीब पळून जाण्याची शक्यता असल्यामुळे मालदीव सरकारने भारताच्या मदतीने येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
मालदीवमध्ये 28 सप्टेंबर 2015 रोजी तेथील तत्कालीन राष्ट्रपती यामीन अब्दुल गयूम यांच्या बोटीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यानंतर मालदीव सरकारने तत्कालीन उपराष्ट्रपती अहमद अदीब यांच्याविरुद्ध राष्ट्रपतींच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी खटला भरला. त्यामुळे त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. मात्र, अहमद अदीब यांनी आपल्याला डोळ्याचा ग्लोऊकोमा हा आजार असल्याचे तेथील सरकारला सांगितले होते.
त्यामुळे मालदीव सरकारने भारत सरकारशी संपर्क साधून त्यांना 14 जून रोजी पुण्यातील एका रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी पाठवले आहे. त्यानंतर गेल्या 10 दिवसांपासून त्यांच्या डोळ्याच्या आजारावर पुण्यात उपचार सुरू आहेत. त्याप्रमाणेच त्यांना त्यांच्या डोळ्याची नियमित तपासणी करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले आहे. मात्र, मालदीव सरकारच्या आदेशानुसार अहमद अदीब यांना मालदीवला परतने बंधनकारक आहे. त्यामुळे ते बुधवारी मालदीवला परतणार असल्याचे सांगण्यात आले आहे.