पुणे - भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. काही दिवसांपूर्वी कुख्यात गुन्हेगार गजानन मारणे याने तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर पुणे-मुंबई महामार्गावरून रॅली काढली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी रॅलीत सहभागी झालेल्या अनेकांवर कारवाई केली होती. याच प्रकरणात संजय काकडे यांची देखील काही दिवसांपूर्वी चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आज अटक करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी गुंड गजा मारणेची खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाली. त्यानंतर तळोजा कारागृहातून बाहेर पडल्यानंतर गजा मारणे याने शक्तिप्रदर्शन केले होते. अनेक जण त्याच्या स्वागतासाठी तळोजा कारागृह बाहेर जमले होते. यावेळी त्याने मुंबई महामार्गावरून रॅली देखील काढली होती. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत गजा मारणेसह त्याच्या अनेक साथीदारांना यापूर्वीच अटकही केली आहे. दरम्यान संजय काकडे यांची देखील गजा मारणेसह काही गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी चौकशी केली होती. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गुन्हेगारी स्वरूपाच्या पार्श्वभूमी असणाऱ्या 20हून अधिक टोळ्याविरोधात पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. त्यानंतर आज भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदार संजय काकडे यांना पोलिसांनी अटक केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - प्रजासत्ताकदिनी कोकणकड्यावर फडकला सर्वात मोठा तिरंगा
हेही वाचा - पुण्यात रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातलगांनी केली डॉक्टरांना मारहाण, रुग्णालयाची तोडफोड