पुणे Food Poison To Train Passenger : चेन्नईवरुन पुण्याकडं येत असलेल्या भारत गौरव रेल्वे गाडीमध्ये 40 प्रवाशांना विषबाधा झाली. मध्यरात्री पुणे रेल्वे स्थानकावर या 40 प्रवशांना प्राथमिक उपचार देण्यात आले असून सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर आहे. 40 प्रवाशांना विषबाधा झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
चेन्नईवरुन पुण्याला येत होती भारत गौरव रेल्वेगाडी : आयआरसीटीसीची भारत गौरव पॅकेज टुरिस्ट ट्रेन मंगळवारी रात्री चेन्नईवरुन पुण्याला येत होती. यावेळी ट्रेनमधील प्रवाशांना जेवण देण्यात आलं. यातून जवळपास 40 प्रवाशांना विषबाधा झाली. या विषबाधा प्रकरणाची माहिती तत्काळ रेल्वे प्रशासनाकडून ससून हॉस्पिटलला देण्यात आली. त्यामुळे डॉक्टरांची एक टीम रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आली. ही ट्रेन पुण्यात दाखल झाल्यावर त्यांना तत्काळ स्थानकावर प्राथमिक उपचार देण्यात आले आहे. आता या सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी अन्न का तपासलं नाही ? : याबाबत रेल्वे प्रवाशी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शाह म्हणाल्या की "या रेल्वे गाडीत आयआरसीटीसीचे दोन अधिकारी हे तैनात असतात. त्यांनी हे जेवण का तपासलं नाही. प्रवाशी हे 10 दिवसांच्या टुरनुसार पैसे देतात. त्यानुसार प्रवाशी मिळणाऱ्या सुविधा घेतात. या अधिकाऱ्यांनी हे अन्न तपासलं पाहिजे होतं. याची चौकशी करण्यात यावी, अशी शाह यांनी मागणी केली आहे.
विविध राज्यातील प्रवाशी : भारत गौरव यात्रा ही विशेष रेल्वे चेन्नई ते पुणे या दरम्यान धावत होती. यावेळी रेल्वेत दिलेल्या अन्नातून प्रवाशांना विषबाधा झाली. या प्रवाशांना उलट्या आणि मळमळीचा त्रास होत असल्याची तक्रार काही प्रवाशांनी केली होती. यावेळी रेल्वे प्रशासनानं तत्काळ पुणे रेल्वे स्थानकावर याबाबतची माहिती दिली. त्यामुळे ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांनी रेल्वे स्थानकावर धाव घेत प्रवाशांवर उपचार केले. भारत गौरव यात्रा या विशेष रेल्वेत विविध राज्यातील प्रवाशी प्रवास करत आहेत.
हेही वाचा :