पुणे - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गेले काही महिने हॉटेल बंद होते. लॉकडाऊन काही अंशी शिथिल करण्यात आल्यानंतर हॉटेलमध्ये पार्सल सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यासाठी मर्यादित वेळ दिला होता. मात्र, आता पुण्यात पार्सल सेवेसाठी हॉटेल संध्याकाळी सात नंतरही सुरू ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. यामुळे हॉटेल चालकांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या धोक्यामुळे हॉटेल चालकांना फक्त पार्सल आणि 'टेक अवे'ची परवानगी आहे. यापूर्वी केवळ सायंकाळी 7 वाजेपर्यंतच यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यापेक्षा जास्त वेळ हॉटेल सुरू असल्यास व्यावसायिकांना दंड आकारला जात होता. वेळेच्या मर्यादेमुळे हॉटेल चालक आर्थिक संकटात सापडले होते. तसेच पार्सलच्या ऑर्डसही रात्री सात नंतरच मिळतात. त्यामुळे 7 ऐवजी रात्री अकरापर्यंत वेळ वाढवून देण्याची मागणी पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेल्स असोसिएशनने केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महानगरपालिका प्रशासनाने पार्सलची वेळ वाढवून दिली आहे.
दरम्यान, पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांचे लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या सहा महिन्यात हॉटेल व्यवसायाला अंदाजे 500 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अडीच लाख हॉटेल कामगार बेकार झाले आहेत, अशी माहिती हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी दिली.