पुणे - प्रसिद्ध येवले चहावर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) कारवाई केली. कोंढव्यात गोडाऊनमधून चहा पावडर, चहा मसाल्याचा ६ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. येवलेंच्या चहा पावडर, चहा मसाल्यावर पुढील आदेश येईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
येवले फूड प्रोडक्टचे कोंढव्यात गोडाऊन आहे. या गोडाऊनमधून येवले चहासाठी लागणारे चहा पावडर, साखर आणि चहा मसाला पुरवला जातो. या साहित्याच्या पाकिटांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार त्या पदार्थाची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. मात्र, या गोडाऊनमधील पाकिटांवर अशी कुठलीही माहिती नव्हती.
हेही वाचा - जागावाटपाचा तिढा भारत-पाकिस्तानच्या 'फाळणी'पेक्षाही कठीण - संजय राऊत
या वस्तूंचे उत्पादन होत असताना देखरेखीसाठी तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. येवलेंच्या कोंढव्यातील गोडाऊनमध्ये सुरक्षेचे कोणतेही नियम पाळण्यात आलेले नव्हते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या गोडाऊनवर छापा टाकला.