पुणे - लोणावळा आणि खंडाळा या शहरांना पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. राज्यातून आणि पुणे जिल्ह्यातून अनेक पर्यटक याठिकाणी दाखल होतात. तर आज सकाळपासूनच शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला असून धुक्याची गडद चादर हिरवळ असणाऱ्या डोंगरावर पसरली होती. त्यामुळे हवेत निर्माण झालेला आल्हाददायक गारवा पर्यटकांना खेचून घेत होता.
मुख्य शहरातून स्वछ हवा मिळावी म्हणून अनेक पर्यटक हे अमृतांजन पूल, भुशी डॅम, टायगर पॉईंट, नागफणी पॉईंट, आयएनएस शिवाजी, मंकीहील याठिकाणी येऊन निसर्गाचे लोभणीय रूप पाहत असतात. खरेतर शनिवारी आणि रविवारी खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते. त्यामुळे अनेक शहराजवळील नागरिक, पर्यटक हे सुट्टीचा दिवस सोडून इतर दिवशी जातात. गर्दी नसल्याने कुटुंबासमवेत पाऊसात भिजण्याचा आनंद घेता येतो. हुल्लडबाजीचे प्रमाण कमी असते. या विचाराने ते इतर दिवशी पर्यटनस्थळी गर्दी करतात.
आज शहरात सकाळपासूनच जोरदार पाऊस झाल्याने लोणावळा आणि खंडाळा परिसरात धुक्याची चादर पसरली होती. त्यामुळे येथे आलेल्या पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, यावर्षी आत्तापर्यंत १९८२ मिमी एवढा पाऊस झाला आहे. तर मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी पाऊस पडल्याचेही बोलले जात आहे.