पुणे - विभागात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 लाख 5 हजार 591 लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्याचबरोबर, स्थलांतरितांची व्यवस्था एकूण 330 निवारा केंद्रात करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त दिलीप म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
मृतांमध्ये, सांगलीतील 11, कोल्हापूरातील 2, पुण्यातील 6, साताऱ्यातील 7, सोलापूरातील 1 अशा एकूण 27 जणांचा समावेश आहे. साताऱ्यातील दोन तर कोल्हापूरातील 5 तालुक्यात आजही अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
सांगली जिल्ह्यात पुराच्या पाण्यात आज पलूस ग्रामपंचायतची खासगी बोट उलटून 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. 20 जण वाहून नेण्याची क्षमता असताना या बोटेत 30 हुन अधिक नागरिक प्रवास करत होते. यापैकी, 9 जणांचे मृतदेह सापडले आहेत.