पुणे - एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर पुण्यात 11 मार्च रोजी मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांनी तब्बल 8 तास लाल बहादूर शास्त्री रस्ता रोखून धरला होता. या आंदोलनादरम्यान पुणे पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तावर होते. यातील पाच अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
पाच जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह -
11 मार्च रोजी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. यादरम्यान मोठी गर्दी झाल्याने या ठिकाणी कोरोना नियमांचा सर्वांनाच विसर पडला होता. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचारीदेखील या ठिकाणी तैनात होते. या वेळी आंदोलक विद्यार्थ्यांसोबत आणि भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या सोबत पोलिसांची चांगलीच झटापट झाली होती. परंतु आता यातील पाच पोलीस कर्मचारी आता कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती पुढे आली आहे. आंदोलन संपल्यानंतर काही कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली होती. त्यानंतर यातील कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी केली असता, पाच जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आंदोलन पोलिसांना चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे.