दौंड (पुणे) - दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एका बंद असलेल्या कंपनीच्या आवारातील गवताच्या पालापाचोळ्याला आज (दि. 14 मार्च) दुपारी अचानक आग लागली. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील अग्नीशामक दलाच्या जवानांनी ही आग वेळेत आटोक्यात आणली. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत अनेक रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या असल्याने वेळीच आग आटोक्यात आल्याने अनर्थ टळला आहे.
अनेक दिवसांपासून बंद होती कंपनी
दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्या आहेत. मागील अनेक दिवसांपासून कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील येथील स्नेहा अॅन्टीबायोटीक ही कंपनी बंद आहे. या कंपनीच्या आवारात गवत व झाडांचा पालापाचोळा मोठ्या प्रमाणात पसरला आहे. आज दुपारी या पालापाचोळ्यास आग लागली. ही आग मोठ्या प्रमाणात पसरली होती .
अग्निशामक दलाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात
या घटनेची माहिती मिळताच कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील अग्नीशामक बंब पाचारण करण्यात आले . काही वेळातच अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली . यामुळे पुढील संभाव्य धोका टळला . मात्र कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपनीला आग लागण्याच्या घटना यापूर्वी अनेक वेळा घडल्या आहेत . आणि सातत्याने अशा घटना घडण्याची शक्यता ही नाकारता येत नाही, यामुळे त्यादृष्टीने या वसाहतीत पुरेसा प्रमाणात योग्य त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
हेही वाचा - शरद पवार यांची मनसुख हिरेन प्रकरणावर प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा - होळमध्ये कृषी आकस्मिक निधीतून २ रोहित्रांची उभारणी