पुणे - कोंढवा परिसरातील गॅरेजला लागलेल्या भीषण आगीत चार ते पाच मोटारी जळून खाक झाल्या आहेत. ही घटना कौसरबाग परिसरात बुधवारी (दि. 24 जून) रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीमुळे चार ते पाच भंगार गोदाम आणि इतरही दोन दुकानांना आग लागली होती. तब्बल पाऊण तासाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कौसरबाग परिसरात असलेल्या गॅरेजमध्ये मोठ्या संख्येने चारचाकी दुरुस्तीसाठी येत असतात. रात्री साडेअकराच्या सुमारास या गॅरेजमधून धूर येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर आगीने हळूहळू रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दलाला ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ही आग लागली तेव्हा 10 ते 15 मोटारी गॅरेजमध्ये होत्या. यातील चार ते पाच मोटारी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या, तर इतर मोटारी अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढल्या. दरम्यान, या आगीची झळ बसून गॅरेजशेजारी असलेले भंगार गोदाम व आणखी दोन इतर गॅरेजलाही आग लागली होती. यामध्ये त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या, तीन वॉटर टँकर आणि तीन देवदूत गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. पाऊण तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने जीवितहानी नाहीकोंढवा परिसरातील हा भाग नेहमी गजबजलेला असतो. याठिकाणी नागरिकांची मोठी वर्दळ असते. रात्रीच्या वेळी ही आग लागल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
हेही वाचा - 'गोपीचंद पडळकरांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज'