पुणे - शिक्षणाची ओढ व इच्छाशक्ती असली की स्वस्थ न बसता त्या दिशेला जाण्याचा मार्ग अवगत होतोच, पुणे अग्निशमन दलात कर्तव्य बजावणारे जवान राजेश गणपत घडशी यांनी वयाच्या ३७ व्या वर्षी दाखवून दिले. यंदाच्या वर्षी दहावीमधे त्यांनी ४४ टक्के गुण मिळवित त्यांनी यश संपादन केले. त्यांच्या या यशामुळे अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांनी त्यांचे कौतुक करत दलासाठी ही बाब अभिमानास्पदच असल्याचे म्हटले आहे.
जवान घडशी हे मुळ कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील घडशी गावातील रहिवाशी आहेत. वडील अग्निशमन दलातून सेवानिवृत्त असून घडशी यांनी वीस वर्षापुर्वी घरातील बेताची परिस्थितीमुळे दहावीच्या आधीच शाळा सोडली व किरकोळ स्वरुपात पुण्यात जमेल तसे काम करत घराला हातभार लावला. अखेर २००७ साली त्यांची अग्निशमन दलाकडे फायरमन या पदावर नियुक्ती झाली. त्यांना दहावी उत्तीर्ण होण्याची ओढ स्वस्थ बसू देईना म्हणून त्यांनी शिक्षण सोडल्यानंतर तब्बल २० वर्षानंतर ज्ञान प्रसारक विद्या मंदिर, आंबेगाव पठार येथे गतवर्षी प्रवेश घेतला. बिबवेवाडी येथे घडशी सध्या स्थायिक असताना त्यांनी अप्पर येथे बेसके यांच्याकडे शिकवणी घेत होते. घरी व कामावर अभ्यास करत दहावीत यश संपादन केले. घडशी म्हणाले, “इच्छेप्रमाणे दहावी उत्तीर्ण झालो व त्याचे समाधान आहे. कारण कष्टाचे फळ उत्तमच मिळाले. पुढे आता अजून शिक्षण घेत पदवी मिळवण्याचे स्वप्न असल्याचे त्यांनी म्हणाले.