पुणे - लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडण्यास बंदी आहे. मात्र, बारामती येथे रस्त्यावर गर्दी जमवत फळविक्री करण्यात येत होती. यावेळी पोलिसांनी त्यांना बंदी घातली असता पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊसाहेब रामदास मांडे (रा. मढेवडगाव, ता. श्रीगोंदा जि. नगर), वैभव बाळासाहेब मदने (रा. गवारे फाटा, ता. बारामती) आणि राजू माणिक भगवान (रा. कचरे रोड,बारामती), असे तीन फळविक्रेत्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात पोलीस कर्मचारी पोपट नाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, पोलीस कर्मचारी नाळे, पोपट कोकाटे आणि चालक पवार हे शहरात गस्त घालत होते. यावेळी ख्रिश्चन कॉलनीजवळ असलेल्या एका झाडाखाली टेम्पोतून टरबूज विक्री केली जात होती. त्याठिकाणी गर्दी दिसल्याने पोलीस तिथे गेले. यावेळी पोलिसांनी बारामती रेड झोनच्या हद्दीमध्ये येत असताना गर्दी का जमवली? असा विचारले असता आरोपीने अरेरावी केली. तसेच मी इथेच माझी फळे विकणार, असे म्हणत नाळे यांच्या अंगावर धावून गेले. त्यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की करत मारायला सुरुवात केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक पाटील यांनी त्यांची सोडवणूक केली. फळविक्री बंद करून पोलीस ठाण्यात चला, असे तिघांना सांगितले. यावेळी मांडे मी पोलीस ठाण्यात येणार नाही असे म्हणत त्याच्याकडील बुलेटवर बसून पळून जात होता. यावेळी त्याला थांबविले असता त्याने पुन्हा पोलिसांशी त्याची झटापट केल्याचे पोलिसांनी सांगितले.