दौंड(पुणे)- राज्यात सध्या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लावण्यात आले. याचा फटका अनेक व्यवसायांना बसला आहे. त्यामध्ये या काळात दुकाने बंद असल्याने नाभिक समाजाला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे दौंड तालुक्यातील पाटस येथील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शितोळे यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून पाटस परिसरातील तब्बल ३६ नाभिक कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार रुपये अशी एकूण १ लाख ८० हजारांची रोख मदत केली आहे.
लॉकडाऊनचा फटका -
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेवून राज्य सरकारने मागील वर्षाप्रमाणे यंदाही कडक लॅाकडाऊन लागू केला. त्याची अमंलबजावणी ग्रामीण भागातही सुरू झाली, मात्र या महामारीत गोरगोरीब आणि ग्रामीण भागातील नाभिक समाजाला याचा फटका बसला आहे. ग्रामीण भागातील छोटेमोठे सलून व्यवसाय मागील वर्षाप्रमाणे यंदाही बंद आहेत. त्यामुळे अनेक कुटुंब अडचणीत दिवस काढत आहेत.
१ लाख ८० हजारांची आर्थिक मदत :
नाभिक समाजाची परिस्थिती लक्षात घेऊन, त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पाटस येथील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि समाजिक कार्यकर्ते प्रशांत शितोळे पुढे सरसावले. त्यांनी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आणि लगेच नाभिक समाजातील काही प्रमुख कार्यकत्यांची चर्चा करून पाटस परिसरातील सलून व्यवसायिकांची नावांची यादी तयार करून त्यांना प्रत्येकी ५ हजार असे तब्बल १ लाख ८० हजारांची आर्थिक मदत करून त्यांना हातभार लावल आहे .
केवळ माणुसकी जपण्यासाठी मदत -
दरम्यान, याबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शितोळे म्हणाले की, लॅाकडाऊनमुळे सध्या मागील वर्षापासून त्यांची याचा विचार करून त्यांना थोडा आर्थिक हातभार लावावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कोणत्याही स्वार्थ न ठेवता केवळ माणूसकी जपण्यासाठी 36 कुटुंबांना 5 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. इतर दानशुर व्यक्तींनीही आपल्या परिसरातील नाभिक समाजाला आर्थिक मदत करण्यासाठी पुढे येवून सढळ हाताने मदत करावी.
नाभिक संघटनेने आभार मानले -
प्रशांत शितोळे यांच्या या उपक्रमाचे पाटस परिसतून कौतुक करण्यात येत आहे. हा पुणे जिल्ह्यातील पहिला उपक्रम आहे. दौंड तालुक्यात पहिल्यादांच नाभिक समाजाला आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी धावून जाणारे प्रशांत शितोळे पहिले व्यक्ती ठरले आहेत. त्यांच्या कार्याबद्दल दौंड नाभिक संघटनेने आभार मानले आहेत. यावेळी पाटस शाखेचे अध्यक्ष सुदाम गवळी,रविंद्र गायकवाड, नाना पवार,नंदा पंडीत, यासह मान्यवरउपस्थित होते .