पुणे : पुण्यात रंगलेल्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील शिवराज राक्षे याने महाराष्ट्र केसरी किताब मिळवला आहे. तर त्याचाच मित्र महेंद्र गायकवाड याला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले आहे.
पुढील वर्षी मीच महाराष्ट्र केसरी : माझी म्याट्टवरील प्रॅक्टिस कमी झाली आहे. पण आमच्याच तालीमीचा पैलवान विजयी झाल्याने मला आनंद झाला आहे. मी आता खूप तयारी करणार आहे. आणि पुढच्या वर्षी माझ्या सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकून देणार आहे, अशी प्रतिक्रिया महेंद्र गायकवाड यानी सामन्यानंतर दिली.
दोन्ही एकाच तालिमीतले : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील उपविजेता महेंद्र गायकवाड याला शिवराज राक्षे यांनी काही क्षणात चितपट करून महाराष्ट्र केसरी हा बहुमान मिळवला, महाराष्ट्र केसरी साठी झालेले या अटीतटीच्या लढाईत दोन्ही पैलवान पुण्यातीलच असून कात्रज येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल या तालमीमध्ये हे दोन्ही पठ्ठे तयार झाले होते, काका पवार, गोविंद पवार या वस्तादच्या मार्गदर्शनाखाली राक्षे आणि गायकवाड या दोघांनी कुस्तीचे डावपेच शिकले होते. माती आणि गादी कुस्ती स्पर्धेत विजय मिळवत या दोघांनी अंतिम फेरी गाठली होती.
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे : मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशनाचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महाराष्ट्र केसरी' विजेता पैलवान शिवराज राक्षे याला मानाची गदा प्रदान करण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमाला क्रीडा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ब्रिजभुषण शरण सिंह, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, हिंदकेसरी पै.अभिजीत कटके आदी उपस्थित उपस्थित होते.