बारामती - एसटी बसमध्ये प्रवास करणार्या सैनिकाच्या पत्नीच्या 12 तोळ्यांच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारणाऱ्या पाच अटट्ल महिला चोर सांगवी (ता.बारामती) ग्रामस्थांच्या आणि सैनिकाच्या पत्नीच्या दक्षतेमुळे बारामती शहर पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. ग्रामस्थांनी या महिलांना पकडून एसटी बस शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आली. शनिवारी दिनांक (२५) दुपारी ही घटना घडली. पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेतले असून त्या सोलापूरच्या असल्याचे सांगत आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांकडून या महिला चोरांची कसून चौकशी केली जात आहे.
हेही वाचा - बारामतीत अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार; आरोपीला अटक
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार सैनिक पत्नी अश्विनी अमोल सावंत या सातारा- करमाळा एसटी बसने (एम एच 14 बीटी 4320) साताऱ्यातील सासरहून माहेरकडे येत होत्या. त्यांच्या सोबत त्यांची आत्या आणि दोन लहान मुले होती. एका प्रवासी बॅगमध्ये त्यांनी आपले दागिने सोबत आणले होते. मात्र, एसटी फलटणमध्ये आले असताना या पाच महिला गाडीमध्ये बसल्या. त्यांच्यापैकी एका चोर महिला अश्विनी यांच्या शेजारी बसली. त्यांनी सावंत यांची बॅग इकडे तिकडे सरकवण्याचा करण्याचा प्रयत्न केला असता आश्विन यांनी त्याला विरोध केला. परंतु या चोर महिला गप्प बसल्या नाही, काही वेळ शांत राहत त्यांनी पुन्हा आपले गुण दाखवायला सुरुवात केली.
हेही वाचा - कृषिक २०२०: बारामतीत शेती प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद; आधुनिक तंत्रज्ञानासोबत समृद्ध शेतीचे धडे
एसटी बस सांगवीत आली असता उतरताना अश्विनी यांच्या आत्याला त्यांनी ढकला ढकल केली. सावंत यांच्याकडील एक बॅगची चैन उघडून त्यामध्ये ठेवलेली दागिण्याची प्लॅस्टिक पिशवी त्यांनी लंपास केली. सांगवी बस स्थानकावर उतरताच सावंत बॅगची चैन थोडीशी उघडी असल्याचे लक्षात आले. तर आतमध्ये दागिण्याची प्लॅस्टिकची पिशवी नसल्याने त्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. सांगवी बस स्थानकावर रामभाऊ तावरे हे मुलीला सोडण्यासाठी आले होते. त्यांनी माहिती घेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे माजी तालुकाध्यक्ष किरण तावरे यांना घडलेली घटना सांगितली. सावंत यांच्याकडील एसटी तिकीटावर गाडीचा क्रमांक आणि अन्य उल्लेख होता. त्यामुळे ही बस बारामतीकडे येणार असल्याचे पाहून बारामती फलटण नाक्यावर तावरे यांनी ही बस थांबवली आणि त्यांनी थेट शहर पोलिस ठाणे गाठले. तेथे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, सहाय्यक निरीक्षक पद्मराज गंपले, उपनिरीक्षक योगेश शेलार आणि कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी एसटीमध्ये चढत आरोपी महिलांचा शोध घेत त्यांना खाली उतरवले त्यांच्याकडे सावंत यांच्याकडील सुमारे 12 तोळे दागिने आणि दीड हजाराची रोकड मिळाली. त्यानंतर बस पुढे मार्गस्थ करण्यात आली. याप्रकरणी ज्योती राजु गाजवार, मंजुळा व्यंकटेश गाजवार, यल्लमा शंकर गाजवार, दीपा रघु गाजवार, गीता राजु गाजवार (सर्व सध्या रा. सोलापूर पाण्याची टाकी, अक्कलकोट रोड) या पाचही महिलांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली.