मावळ (पुणे) - मावळमधील कुसगाव येथील धबधब्याच्या पाण्यात बुडून दोन मुलांसह वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वडिल दोन्ही लहान मुलांसह कुसगाव खुर्द धबधब्याच्या परिसरात पर्यटनासाठी गेले होते. मात्र, त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांची नावे
पिराजी गणपती सुळे, साईनाथ पिराजी सुळे (वय 14 वर्षे) आणि सचिन पिराजी सुळे (वय 11 वर्षे) अशी मृत्यू झालेल्या वडिल आणि मुलांची नावे आहेत. हे सर्व इंद्रायणी कॉलनी कामशेत येथे राहत होते. ते मूळ नांदेड जिल्ह्यातील होते. याबाबतची माहिती कामशेत पोलिसांनी दिली आहे.
बुडालेल्या मुलांचा वाचवताना बापाचाही मृत्यू
पिराजी हे दोन्ही मुलांसह वर्षाविहारासाठी कुसगाव खुर्द येथील धबधब्याच्या परिसरात आले होते. तेव्हा, दोन्ही मुलं मोठ्या खड्ड्यात धबधब्याच्या साचलेल्या पाण्यात खेळत होती. त्यांना पाण्याच्या खोलीचा आणि गाळाचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. तेव्हा, त्यांनी वडिलांना आवाज दिला. वडिलांनी पुढे मागे न पाहता पाण्यात उडी घेतली आणि मुलांना वाचवण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला. परंतु, या दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू झाला, अशी माहिती कामशेत पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. संबंधित घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. घटनेचा अधिक तपास कामशेत पोलीस करत आहेत.
हेही वाचा - हिमाचलमध्ये डोंगर कोसळून 9 जणांचा मृत्यू, 3 जखमी, मृतांमध्ये एकजण महाराष्ट्रातील