पुणे - ऐन सणासुदीच्या व विधानसभा निवडणुकीच्या दिवसांत पुन्हा भामा-आसखेड धरणग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहे. एका बाजूला शासन काम बंद ठेवणार असे सांगते, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना विश्वासात न घेता काम सुरू करते हा आमचा विश्वासघात आहे. असा आरोप करत जोपर्यंत जॅकवेल आणि जलवाहिनीचे काम बंद केले जात नाही आणि ठरल्याप्रमाणे एक किलोमीटर जलवाहिनीचे काम बाकी ठेवायचे आहे. त्या ठिकाणी पसरवलेले लोखंडी पाईप उचलले जात नाहीत तोपर्यंत ठिय्या मोडणार नाही, असा पवित्रा आज भामा आसखेड प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी घेत धरण परिसरात ठिय्या मांडला. यावेळी बाधित गावांमधील जवळपास चारशेच्यावर शेतकरी उपस्थित होते.
शासनाकडून आमची फसवणूक होत असून मागील दीड वर्षापासून मिटिंग होत नसल्याचा आरोप केला. प्रशासनाने आमच्यावर बळजबरी करू नये तसे केल्यास कुटुंबसह पाण्यात उतरून जलसमाधी घेऊ असा इशारा दिला. ज्या वेगाने काम सुरु आहे त्या वेगाने प्रश्न सुटत नाही अशी खंत व्यक्त करत एक किलोमीटर अंतरात जेवढे पाईप ठेवलेत तेवढे काढावे अशी विनंती केली. जर चर्चा होऊन देखील जर जलवाहिनी ठेकेदार एक किलोमीटरचे काम सुरू ठेवत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने देविदास बांदल यांनी केली.
धरण परिसरात जॅकवेलचे काम सुरू ठेवण्यासाठी १७ जून पासून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सद्या ५० पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे. आंदोलक येणार असल्याने अजून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. चाकण पोलिस स्टेशनच्या वतीने पोलिस निरीक्षक कल्याण पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.