पुणे - खरीप हंगामाच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे काही शेतकऱयांनी पेरणी करुन घेतली तर काहींनी वेगात मशागतीची कामे आटोपून घेतली. सुरुवातीला शेतकऱ्यांना आशेला लावून पाऊस आता दडी मारून बसला आहे. पुण्याच्या ग्रामीण भागातील 50 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली नाही तर ज्यांनी पेरणी केली होती त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहे.
सध्या खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरुर तालुक्यात पेरणीची लगबग सुरू आहे. मात्र, पुरेसा पाऊस नसल्याने अनेक भागात पेरणा रखडल्या असून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. तर काही भागात मृग नक्षत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या. पेरणीनंतर काही भागात बियाणे खराब लागले तर काही भागात पावसाने दडी मारली. त्यामुळे पेरणी करुन शेतकऱ्यांची मेहनत, वेळ आणि पैसा वाया गेला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
पुण्याच्या खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात 60 हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होणे अपेक्षित आहे. त्यानुसार जून महिन्याच्या सुरुवातीला 25 हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली. मात्र, पेरणी झाल्यानंतर पावसाने पाठ फिरवली व कडाक्याच्या उन्हाची ताप पडली. त्यामुळे शेतक-यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय दुबार पेरणी करुन नये, असे आवाहन कृषी तज्ञांनी केले आहे.