पुणे (बारामती) - मागील दोन वर्षांपासून अवकाळी, गारपीट व कोरोना संकटामुळे शेतकरी पूर्णतः खचून गेला आहे. आसमानी, सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या परिस्थितीतून सावरण्याच्या आतच सरकारने रासायनिक खतांच्या किमती वाढवल्यामुळे आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे, शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - अनोखी शक्कल.. ग्रामस्थांनी संपूर्ण गावाला केले शाळा, चालता बोलता होतो आभ्यास
सध्या शेतकरी वर्गाकडून खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. तसेच, बागायती पट्ट्यात खरीप हंगामातच उसाची लागवडही केली जाते. नेमक्या याच काळात रासायनिक खतांच्या किमतीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचे गणित कोलमडणार आहे. कोरोना संकटामुळे अनेक ठिकाणी शेतमालाला कवडीचीही किंमत मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे, आगामी हंगामात भांडवल कसे उभे करायचे? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
खतांच्या किमती कमी करण्याची मागणी
इंधन दरवाढीमुळे मशागतीचा खर्च वाढला आहे. आता खतांच्या किंमती वाढल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला येणार आहे. नुकतेच केंद्र सरकारने किसान सन्मान योजने अंतर्गत 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. त्यानंतर लगेच रासायनिक खतांच्या किंमती वाढल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात असून खतांच्या किमती कमी करण्याची मागणी केली जात आहे.
वादळामुळे डाळिंब बागेचे अडीच लाखांचे नुकसान
कालच्या वादळी वाऱ्यात माझ्या दीड एकर डाळिंब क्षेत्राचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. मागील अवकाळी बरोबरच कोरोना संकटामुळे मालाला उठाव नसल्याने मोठे नुकसान झाले होते. खतांंसह इतर बाबींसाठी एकरी एक ते दीड लाख रुपये खर्च होतो, मात्र आता खतांच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्च वाढणार आहे. पर्यायाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. या बाबीकडे लक्ष देऊन सरकारने खतांच्या किमती कमी कराव्यात, अशी अपेक्षा बारामती तालुक्यातील सावळ येथील शेतकरी प्रकाश आटोळे यांनी व्यक्त केली.
अनुदान द्या किंवा खतांच्या किमती कमी करा
शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आहेत, त्यामुळे सहाशे ते सातशे रुपये आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेती करणे अवघड होऊन बसले आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या परिस्थितीची दखल घेऊन शेतकऱ्यांना भरघोस अनुदान द्यावे किंवा खतांच्या किमती कमी कराव्यात. अशी अपेक्षा तरुण शेतकरी राहुल भिसे यांनी व्यक्त केली.
रासायनिक खतांचे जुने व नवीन दर
खते जुने दर नविन दर
10:26:26 - 1175 - 1775
12:32:16 - 1190 - 1800
24:24:0 - 1350 - 1900
20:20:0 - 975 - 1350 ते 1400
20:20:13 - 1050 ते 1000 - 1350 ते 1600
डीएपी - 1185 ते 1200 - 1900
पोटॅश - 850 - 1000
हेही वाचा - 'मराठा समाजाने संयम बाळगावा, ही वेळ मोर्चे काढायची नाही'