बारामती (पुणे) - बारामती परिमंडलातील शेतकऱ्यांना दुप्पट, तिप्पट खोटी वीज बिले देण्यात आली आहेत. त्याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही बारामतीच्या उर्जा भवनावर आलो आहोत. राज्य शासनाने शेतकऱ्यांना १६ तास वीज देणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात ८ तास शेतकऱ्यांना वीज मिळते व वीज बिल मात्र १६ तासांचे मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचेच ८ तासाचे पैसे महावितरणकडे राहतात. त्यामुळे आम्ही विज बिल भरणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघूनाथदादा पाटील यांनी मांडली.
बारामती येथील महावितरणचे कार्यालय हे चार ते पाच जिल्ह्यांचे प्रमुख कार्यलय आहे. म्हणून येथे आंदोलन करत आहे. त्याचा कोणाताही राजकीय अर्थ काढू नये, असे रघूनाथदादा पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी वर्षा काळे, शिवाजीराव नांदखिले, पांडुरंग रायते, अशोक खलाटे, रामभाऊ साखडे, बाळासाहेब घाटगे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.