पुणे - जिल्ह्यातील कोथिंबीर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. शिरुर तालुक्यातील चांडोह येथील बबन गावडे यांनी आपल्या शेतात १०० किलो धणे लावले होते. वातावरणातील बदलामुळे रोगराईपासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्चही झाला. मात्र, कवडीमोल बाजार भाव मिळत असल्यामुळे त्यांनी उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे.
उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरुर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात बाराही महिने उत्पादन घेतले जाते. यावर्षी फेब्रुवारी ते मे या महिन्यांमध्ये या भागात भीषण दुष्काळ पडल्याने शेतकरी आधीच संकटात सापडला होता. पावसाळा सुरू झाल्यावर वरूणराजा मेहरबान होईल आणि शेतात चांगले उत्पादन घेता येईल अशी भाबडी अशा बळीराजाला होती. पण, उत्पादन खर्चही भागत नसल्याने हवालदिल झालेल्या बळीराजाने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले हे पीक स्वत:च्या हाताने उध्वस्त करण्याचा निर्णय घेतला.
दुष्काळातून उभ्या राहिलेल्या शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडेल अशी आशा होती. मात्र, कवडीमोल भावामुळे त्या आशेवरही पाणी फिरले आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजावर आज 'आम्ही जगायचं तरी कसं' असं म्हणायची वेळ आलीये.