पुणे- जिल्ह्यातील शिरूर तालुका बऱ्यापैकी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, या परिसरातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीवर मात करून फळलागवडीकडे वळाले आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सणसवाडीच्या बबन दरेकर यांनी ५ एकर जिरायत शेतात पेरू लागवड केली होती. ३ वर्षाच्या मेहनतीनंतर त्यांना पेरूचे भरघोस उत्पादन तसेच भरपूर नफाही मिळत आहे.
दरेकर व परिसरातील इतर कुटुंबांना दुष्काळाची झळ सोसोवी लागली होती. त्यामुळे त्यांनी कमी पाणी व कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या पेरूची लागवड केली. त्यानंतर ३ वर्षांच्या अथक परिश्रमाचे फळ त्यांना आता मिळाले आहे. त्यांच्या शेतात पेरूचे भरमसाठ उत्पादन झाले आहे. महत्वाचे म्हणजे त्यांचे शेत पुणे-नगर महामार्गावर असल्याने ते आपल्या फळबागेतील पेरू किरकोळ विक्रेत्यांना विकतात. त्यामुळे त्यांच्या नफ्यात भर झाली आहे. त्याचबरोबर, विकत घेतलेले पेरू किरकोळ विक्रेते महामार्गावरुण ये-जा करणाऱ्या प्रवाशांना विकतात. त्यामुळे प्रवाशांना देखील स्वादिष्ट पेरूंचा आस्वाद घेता येत आहे.
व्यापाऱ्यांकडून मिळतो कमी भाव
परिसरातले अनेक पेरू उत्पादक शेतकरी पुण्याच्या मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना थेट पेरू विक्री करतात. मात्र, व्यापाऱ्यांकडून चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी किरकोळ विक्रेत्यांना जाग्यावर विक्री करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, पेरूला मार्केटपेक्षा १० ते २० रुपये अधिक मिळू लागले आहेत. किरकोळ विक्रेते ४० ते ८० रुपये किलो दराने शेतकऱ्यांकडून पेरूची खरेदी करत आहेत.
सद्या पुणे-नगर महामार्गावरील पेरणेफाटा टोलनाक्यावर ५० हून अधिक विक्रेते थेट शेतातून तोडून आणलेल्या पेरुची विक्री करतात. रोजच्या बाजारात मिळणाऱ्या पेरूपेक्षा स्वस्त आणि चविष्ट असलेले हे पेरू खरेदी करणाऱ्यांची संख्याही अलिकडे प्रचंड वाढली आहे. दरेकर कुटुंबीयांनी आपल्या पारंपरिक शेतीला फाटा दिला व कमी खर्चात चांगले उत्पादन मिळविले. त्यांची ही संकल्पना प्रत्येक शेतकऱ्यांनी अवलंबून एक यशस्वी शेती करण्याची सध्या गरज आहे.