पुणे - गाव, शहर म्हटलं की भटकी, मोकाट कुत्री आलीच, पण हीच भटकी मोकाट कुत्री कधी कोणाला चावा घेतील याचा काही नेम नाही. ही भटकी कुत्री एवढ्यावरच न थांबता आजूबाजूला असणाऱ्या शेतातही जाऊन शेतात लावलेल्या पिकांचे नुकसानही करत असतात. याच भटक्या मोकाट कुत्र्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी जुन्नर तालुक्याच्या कावळ पिंपरी गावातील एका शेतकऱ्याने अनोखी शक्कल लढवली आहे. या शेतकऱ्याने लाला रंगाचे पाणी बाटल्यांमध्ये भरून त्या शेतात ठेवल्या आहेत.
भटक्या, मोकाट कुत्र्यांपासून शेतात लावलेल्या फ्लॉवरच्या लहान-लहान रोपांचे संरक्षण व्हावे, यासाठी शरद पाबळे या शेतकऱ्याने आपल्या शेताच्या सर्व बाजूने लाल रंगाच्या बॉटल भरून ठेवलेल्या आहेत. फ्लॉवरचे रोप लहान असताना त्यावरती जर कुत्र्यांचा पाय पडला तर हे फ्लॉवरचे रोप जळून जाते. त्यामुळे या शेतकऱ्याने बॉटलमध्ये कुंकवाचे लाल पाणी भरून ठेवले असून या लाल रंगाला कुत्रे घाबरतात आणि या शेतात येत नाहीत तसेच पिकाचेही संरक्षण होते, असा या शेतकऱ्याचा अनूभव आहे.
शहरी भागात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव झाला की हीच कुत्री ग्रामीण भागात सोडली जातात. त्यनंतर आता ही कुत्री शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत असताना शेतकऱ्यांनी एक वेगळी शक्कल शोधून काढली आहे.