पुणे - शिकवणीवर्गात येणाऱ्या नववीच्या विद्यार्थिनीची छेड काढल्याने पालकांनी शिकवणी चालकाची धुलाई केली. पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात सोमवारी हा प्रकार घडला असून संबंधित शिकवणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक देखील करण्यात आली आहे.
सूर्यप्रकाश पाटील (वय ३४ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो खासगी शिकवणी वर्ग चालवतो. यामध्येच पीडित मुलगी शिकवणीसाठी येत होती. गेल्या ८ दिवसांपूर्वी आरोपीने पीडित मुलीला 'तू मला आवडतेस' असे सांगून प्रेमाची गळ घातली. मात्र, मुलीने त्याला दाद दिली नाही. त्यानंतर पीडित मुलीने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यांनी आरोपीला जाब विचारला. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी त्याची धुलाई केली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली.