बारामती (पुणे) - शहरातील औद्योगिक वसाहतीमधील भूखंड स्वतःच्या मालकीचा व्हावा यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या नावाचे बनावट शिफारस पत्र तयार करून सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहेल गुलमोहम्मद शेख (रा. बारामती क्लब रोड, बारामती) असे आरोपीचे नाव आहे.
सलीम फकीर महंमद बागवान (वय ५५,रा.कचेरी रोड बारामती ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सोहेल शेखविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गतवर्षी हा प्रकार झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. सोहेल शेख यांच्या सासऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला. सोहेल व त्यांच्या सासऱ्यातील वाद मिटविण्याकामी तक्रारदाराने पुढाकार घेतला होता. या कामी सोहेल याने तक्रारदाराची भेट घेतली असता, सासऱ्यांनी दिलेले पत्र तक्रारदाराने सोहेल याला दाखविले. त्याने मूळ पत्र सादर करत उद्योगमंत्र्यांनी बारामती एमआयडीसीतील भूखंड माझ्या नावे होण्याची शिफारस केली असल्याचे सांगितले.
मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याला बनावट पत्राविषयी दिली माहिती
सासर्यांनी सरकारी रक्कम न भरल्याने माझी शिफारस झाल्याचे तो म्हणाला. या पत्राविषयी तक्रारदाराने अधिक माहिती घेतली असता त्यावर २८ जून २०१९ अशी तारीख असल्याचे दिसून आले. तक्रारदाराने माहिती अधिकारात उद्योग व खनिकर्म मंत्रालयाकडे माहिती मागविली. त्यावेळी असे कोणतेही पत्र देसाई यांच्या कार्यालयाकडून देण्यात आले नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. शिवाय यासंबंधी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याला बनावट पत्र संबंधित माहिती देण्यात आली. हा प्रकार बारामतीत घडल्याने बारामतीत तक्रार देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार तक्रार देण्यात आली.
सोहेल यांने बारामती औद्योगिक वसाहत मधील कटफळ येथील प्लॉट क्रमांक.जी-३५ स्वतःच्या नावे होण्यासाठी उद्योग मंत्र्यांचे बनावट शिफारस पत्र तयार केले. हा खोटा दस्तऐवज स्वतःजवळ बाळगून सरकारची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.