पुणे - कोविड काळात सर्व मंदिरे बंद होती, परंतु गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी मानवसेवेची महामंदिरे उघडून समाजाची सेवा केली आहे. याकाळात शारीरिक अंतर असले तरी मानसिक अंतर या कार्यकर्त्यांनी आपल्या कामातून कमी केले. कोविड काळात गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आणि अभूतपूर्व आहे. या कठीण काळात सर्वांनी एकत्रित येऊन काम केले, याचा अभिमान वाटतो. ही भावना अमेरिकेसारख्या देशात देखील दिसत नाही. त्यामुळे गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे संकलन असलेले हे पुस्तक पुढची अनेक वर्षे समाजाला संदेश देण्याचे कार्य करेल, असे गौरवोद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
जय गणेश व्यासपीठ या पुण्यातील गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या हक्काच्या व्यासपीठातर्फे शहरातील १०० गणेशोत्सव मंडळांनी कोविड काळात केलेल्या सामाजिक कार्याचे संकलन असलेल्या विघ्नहर्ता कार्यकर्ता या पुस्तकाचे प्रकाशन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराशेजारील स्वागत मंडपात झाले. यावेळी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, उपअधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे, उद्योजक कृष्णकुमार गोयल, श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व जय गणेश व्यासपीठाचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, पुस्तकाचे संपादक पराग पोतदार, शिरीष मोहिते, पीयुष शाह आदी उपस्थित होते.
राईट टू डिजिटल एज्यूकेशन -
कोरोनामुळे शैक्षणिक परिस्थिती बदलली आहे. असे असले तरी कोरोनाने काही संधीही दिली आहे. डिजिटल शिक्षणाला वाव मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्यक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिकारानुसार डिजिटल राईट टू एज्यूकेशन मिळाला पाहिजे, अशी भावना डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केली. तसेच सरकारने विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाला आवश्यक असणारे साधने पुरवावीत, तसेच रयत सारख्या चांगल्या संस्थाना स्वायत्तता द्यावी, अशी मागणी नव्या शैक्षणित धोरणात केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
शाळा लवकर सुरू करा -
2 वर्षे शाळा बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी 10 वर्षे मागे गेले आहेत. अनेक मुलांना शिक्षण घेता आले नाही. एका एक मोबाईल आणि शिकणारे ५ आहे, त्यामुळे शिकायचं कसं हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून प्रत्यक्ष शाळा लवकर सुरू करा, असे परखड मत माशेलकर यांनी व्यक्त केले आहे.
कोविडची तिसरी लाट आपल्या हातात -
कोविडची तिसरी लाट येणार की नाही, हे आपल्या हातात आहे. कोविडनंतर डेल्टा व्हेरिएंट सारख्या विषाणूंचे रुग्ण सापडत आहेत. मास्क बंदी उठविलेला इस्राईल सारखा देश देखील आज लॉकडाऊनमध्ये आहे. त्यामुळे आपले भविष्य आपल्या हातात आहे. प्रत्येकाने लस घेणे,मास्क लावणे आणि सुरक्षित अंतर राखणे यामुळे तिसरी लाट येण्यापासून रोखू शकतो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने गणेशभक्तीच्या पुढे जाऊन अनेक सामाजिक कामे करण्यात येतात. जय गणेश ज्ञानवर्धन योजना, ससूनमधील अन्नछत्र, कुष्ठरोग्यांसाठी काम याशिवाय कोविड काळातील कार्य देखील वाखाणण्याजोगे आहे. गणेशोत्सव मंडळांना समाजातील काही घटक वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. अनेकांना गणेशोत्सव मंडळाच्या सामाजिक कार्याची कल्पना नाही, अस यावेळी डॉ.रघुनाथ माशेलकर म्हणाले.
गणेशोत्सव कार्यकर्ता कसा असायला हवा, हे कोविड काळातील कार्यातून लक्षात येते -
डॉ.विनायक काळे म्हणाले, श्रीमंत दगडशेठ गणपती ट्रस्टतर्फे कोविड काळात व त्यापूर्वीही निरंतरपणे रुग्णांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते. यामुळे हजारो रुग्णांना सकस आहार व चांगले उपचार आम्ही देऊ शकलो, हे गणेश मंडळाचे मोठे कार्य आहे. कोविड काळात अनेक सामाजिक व गणेशोत्सव कार्यकर्ते मदतीसाठी पुढे आल्याने आपण दोन्ही लाटांवर मात करु शकलो, असेही त्यांनी सांगितले. कृष्णकुमार गोयल म्हणाले, गणेशोत्सव कार्यकर्ता कसा असायला हवा, हे कोविड काळातील कार्यातून लक्षात येते. कोविडमुळे खूप काही गोष्टी शिकायला मिळायला. यापुढे कोविडसारखे कोणतेही संकट आल्यास त्यावर मात करायला आपण तयार आहोत.