पुणे - येथे 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेसंदर्भात फादर स्टेन स्वामींच्या रांचीतील घरावर छापा टाकण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
शनिवारवाडा येथे 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद पार पडली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोरेगाव-भीमा येथे दंगल उसळली होती. यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला. तर कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते. याचे पडसाद नंतर संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते.
पुणे पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केल्यानंतर देशभरात विविध ठिकाणी छापेमारी करून आठ जणांना अटक केली. पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात या सर्वांवर गुन्हे दाखल आहेत. हे सर्व सध्या पुणे पोलिसांच्या अटकेत आहेत.
पोलिसांनी 29 ऑगस्ट 2018 रोजीदेखील फादर स्टेन स्वामीच्या रांचीतील घरावर छापा टाकला होता. त्याची चौकशीही करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी तेव्हा त्यांना अटक केली नव्हती. परंतु एल्गार परिषदप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी फादर स्टेन स्वामीच्या घरावर आज सकाळी छापा मारला. त्यांच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.