पुणे - सातबारा कोरा करण्याची भाषा करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एकर आणि हेक्टरमधला फरक कळतो का? अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केली होती. या त्यांच्या टीकेला आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांना एकर आणि हेक्टरमधला फरक कळला नसता तर कर्जमाफी झालीच नसती, असे प्रत्युत्तर शिंदेंनी चंद्रकांत पाटील यांना दिले.
आजपर्यंत जेवढ्या कर्जमाफी झाल्या त्यातली महाविकास आघाडीने केलेली कर्जमाफी सर्वात मोठी आहे. केवळ एका महिन्याच्या आत सरकारने हा निर्णय घेतला. जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकर आणि हेक्टरमधील फरक कळला नसता, तर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला नसता, असे एकनाथ शिंदे म्हणाले. सरकार आपली कामगिरी दमदारपणे बजावत आहे. राज्यातील एकही व्यक्ती उपाशी राहू नये, म्हणून १० रुपयात भोजन थाळी देण्याचा निर्णयही या सरकारने घेतला आहे. इतक्या कमी वेळेत सरकारने हे मोठे निर्णय घेतले आहेत. त्याचा फायदा लाखो लोकांना होणार आहे. हे निर्णय चंद्रकांत पाटलांच्या पचनी पडत नाहीत त्यामुळे ते आरोप करत असल्याचे शिंदे म्हणाले.
कुणी कितीही देव पाण्यात बुडवून बसले तरी महाविकास आघाडीचे सरकार राज्याच्या हिताचे निर्णय घेत राहील. महाविकास आघाडीतील तीनही पक्षाची विचारधारा जरी वेगवेगळी असली तरी राज्यातील जनतेच्या हिताचा विचार करुनच कॉमन मिनिमम प्रोग्रॅम तयार करण्यात आला आहे. त्याच्या पहिल्याच टप्प्यात शेतकरी कर्जमाफी आणि दहा रुपयात भोजनथाळी असे चांगले निर्णय घेतले आहेत. यापुढेही सरकारकडून असेच चांगले निर्णय घेतले जातील, असेही शिंदे म्हणाले.
अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची केवळ अफवा
अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला नाही. त्यांच्या राजीनाम्याच्या केवळ अफवा आहेत. अब्दुल सत्तार यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी स्वतः बोललो आहे. त्यांच्या नाराजीचा विषयच नसल्याचे शिंदे म्हणाले.