पुणे - कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणाची गरज ओळखून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ई-क्लास प्रणाली अर्थात कन्टेंट एक्सप्रेस डिलिव्हरी सेंटर विकसित केले आहे. या प्रणालीद्वारे प्राध्यापकांना त्यांचे ऑनलाइन लेक्चर्सचे व्हिडीओ बनवून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अपलोड करता येणार आहेत. या प्रणालीचा फक्त पुणे विद्यापीठच नाहीतर राज्यातील इतर महाविद्यालयांना देखील लाभ घेता येणार आहे. या 'कन्टेन्ट एक्सप्रेस डिलिव्हरी' (CDX) या ऑनलाइन शिक्षण प्रणालीचे उद्घाटन विद्यापीठात करण्यात आले. विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. ही ऑनलाइन शिक्षण प्रणाली भविष्यात शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
१७५ महाविद्यालयांकडून वापर
'कन्टेन्ट एक्सप्रेस डिलिव्हरी' (CDX) ही ऑनलाइन शिक्षण प्रणाली ई-कन्टेन्ट विकसित करण्यासाठीचे उत्तम व्यासपीठ असून, भविष्यात ही ऑनलाइन शिक्षण प्रणाली शिक्षण क्षेत्रात नक्कीच क्रांती घडवून आणेल. कोरोनामुळे एक खूप चांगली गोष्ट घडली आहे, ती म्हणजे समस्यांचे निदान आपण आपल्या देशातच शोधायला लागलो आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तयार केलेली 'कन्टेन्ट एक्सप्रेस डिलिव्हरी' (CDX) ही ऑनलाइन शिक्षण प्रणाली हे याचे उत्तम उदाहरण आहे. पाश्चिमात्य देशांकडून जे काही येईल ते चांगलेच असेल, असा यापूर्वी आपल्या सर्वांचा समज होता. आता आपण वैज्ञानिक आणि विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोनातून शिक्षण कसे घेता येईल, याचा जास्त विचार करत आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी हा शिक्षणाच्या केंद्रस्थानी असणार आहे, असे भूषण पटवर्धन यावेळी म्हणाले. या ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा वापर सध्या १७५ महाविद्यालयांनी सुरू केला आहे. कोरोनामध्ये ऑनलाइन शिक्षण प्रणालीची ही सुरुवात आहे. लॉकडाऊनच्या काळात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ई-कन्टेन्ट तयार करण्याची ही सुविधा महाविद्यालयांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. १० हजारांहून जास्त महाविद्यालये जोडता येऊ शकतात, एवढी या ऑनलाइन शिक्षण प्रणालीची क्षमता आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ करमळकर यांनी यावेळी सांगितले.