पुणे - कोरोनाकाळापासून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पासची गरज भासते. सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, तरीही ई-पासशिवाय एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास मनाई आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ई-पासबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री यांसोबत चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल.
शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात (सीओइपी) उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, केंद्र आपला निर्णय घेत आहे. मात्र, विविध राज्यांतील कोरोनाबाबतची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे ज्या-त्या राज्याला वेगळा निर्णय घ्यावा लागतो, असेही ते म्हणाले. यावेळी कोरोना काळात राज्यातील सर्वांनी सरकारला सहकार्य केले. यापुढेही सर्वांनी अशीच साथ द्यावी, असे म्हणत पुणे व पिंपरी-चिंचवडकरांना घरीच बाप्पाचे विसर्जन करण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांना पार्थ पवारांबाबत विचारले असता, ज्या विषयावर मी बोलणार नाही त्याबाबत प्रश्न का विचारता, असे म्हणत त्यांनी वेळ मारुन नेली.
हेही वाचा - 'अरे कशाला दाऊद.. दाऊद करत बसलात'