राजगुरुनगर (पुणे) - पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेले भीमा-भामा खोऱ्यातील चासकमान व भामा-आसखेड तर कुकडी प्रकल्पातील पाच धरणांमध्ये डिसेंबर अखेरपर्यंत मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यामध्ये शेती व पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागणार नाही.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उशिरापर्यंत धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने भीमा-भामा खोऱ्यातील व कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणामधून नदीपात्र व कालव्यातून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी पाणीवाटपाचे वर्षभराचे योग्य नियोजन झाले असून कुठल्याही भागात पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही, असे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आल्याची माहिती चासकमान धरण व्यवस्थापक बाबाजी कडलग यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा -
सह्याद्रीच्या कुशीत यंदा उशिरापर्यंत पावसाच्या सरी झाल्यामुळे भामा-आसखेड, चासकमान व कुकडी प्रकल्पातील पाच धरणे टप्प्या-टप्प्याने भरली आहेत. सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधून कालवा व नदीपात्रात पाण्याचे वितरण करण्याची गरज भासली नाही. त्यामुळे धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या शिल्लक राहिलेल्या पाण्याचे वर्षभराचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले असून गरजेनुसार शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जाणार असून यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार नाही. यासाठी प्रामुख्याने लक्ष दिले जाणार आहे.