पुणे - विविध सामाजिक चळवळीत अग्रेसर राहिलेले बाबा आढाव 1 जून रोजी 91 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. 1953 पासून ते विविध सामाजिक चळवळीत आहेत. समाजातील गरीब, कष्टकरी, शोषित, दिनदुबळ्या घटकांना माणूसपण मिळवून देण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे. वृक्षलागवड करून यंदा बाबांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. बाबा आढाव यांच्या आजवरच्या चळवळीत सोबत राहिलेले आणि सध्या बांधकाम मजदूर सभेचे अध्यक्ष असलेले ऍड मोहन वाडेकर यांनी याबद्दल माहिती दिली.
वाडेकर म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात देशभरातील मजुरांवर जे काही अत्याचार झाले ते सहन करण्यापलिकडील आहेत. हे पाहून बाबांना खूप दुःख झाले. बाबांनी आजवर अनेक घटकांमध्ये काम केले. यातील एक गोष्ट म्हणजे 1971-72 च्या दुष्काळानंतर मराठवाड्यातील अनेक नागरिक पुण्यात आले. त्यांनी पुण्याच्या वेगवेगळ्या भागात झोपडया बांधायला सुरुवात केली. या झोपडपट्ट्यांना आधार देण्याचे काम बाबा आढावांच्या झोपडी संघ आणि समाजवाद्यांनी केले.
पुण्यात आजघडीला ज्या झोपडपट्ट्या स्थिरावलेल्या दिसतात, झोपडपट्टी निर्मूलनाच्या कायद्याची अंमलबजावणी होते, याचे सर्व श्रेय झोपडी संघ आणि बाबा आढाव यांना आहे. वयाच्या 91 व्या वर्षीही ते समाजातील वंचित, शोषित, भटके, दलित, आदिवासी आणि इतर घटकांसाठी अस्वस्थ आहेत.
मुस्लिम सत्यशोधक मंडळ संस्थापक अध्यक्ष राहिलेले आणि राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते असलेले मकबूल तांबोळी म्हणाले, बाबांनी सातत्याने कष्टकऱ्यांसाठी काम केले. हमालांच्या अडचणी लक्षात आल्यानंतर त्यांनी हमाल पंचायत समितीची स्थापना केली आणि त्यांचा हा प्रयोग संपूर्ण देशभरात यशस्वी झाला. काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी हक्क आंदोलन चळवळ सुरू केली. यासाठी वयाच्या 88 व्या वर्षी ते उपोषणाला बसले होते.