पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अवघ्या देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले. त्यामुळे ऐरवी केवळ सुट्टीच्या दिवशी एकत्र येणारे पती-पत्नी हे गेल्या साडेचार महिण्यांपासून एकाच छताखाली राहत आहेत. मात्र, किरकोळ कारणावरून होणारे वाद, भांडण हे पोलिसांपर्यंत गेल्याच्या घटना देखील पिंपरी-चिंचवड शहरात पाहायला मिळत आहेत. येथे गेल्या चार महिन्यात महिला हिंसाचाराचे 26 गुन्हे दाखल झाले असून समुपदेशनाने काहींचे संसार वाचवण्यात पोलीस आणि महिला संस्थांना यश आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सर्वात जास्त कामगारवर्ग राहतो. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील उद्योग आणि व्यवसाय हे बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे अनेकजणांनी आपल्या कुटुंबासह पिंपरी-चिंचवड शहर सोडून मूळगावी जाणे पसंद केले. मात्र, काही प्रमाणात उच्चशिक्षित वर्ग हा शहरातच राहिला. यापैकी, काहींचे 'वर्क फ्रॉम होम' हे सुरू होते. सध्या कोरोनाचा प्रभाव हा कायमच असून वस्तूस्थिती सामान्य होण्यास अद्याप वेळ आहे. मात्र, या लॉकडाऊनदरम्यान काही घरातील परिस्थीती ही गंभीर झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. या काळात अनेक कुटुंबात किरकोळ कारणावरून पती आणि पत्नीचे भांडण झाल्याची उदाहरणे समुपदेशन करणाऱ्या शुभांगी जोशी यांनी सांगितली. एकमेकांचे लॅपटॉप पाहणे, मोबाईल चेक करणे, मेल चेक करणे असे प्रकार होऊ लागले आहेत. यात एकमेकांना समाधानकारक उत्तर मिळाली नाहीत तर टोकाची भूमिका घेऊन वादाचे रुपांतर भांडणात झाल्याचं त्या सांगतात.
लॉकडाऊन लागू झाल्यानंतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांकडे घरकाम करणारे कामगार बंद झाले होते. त्यामुळे, घरातील काम कोण करणार, अशा किरकोळ आणि क्षुल्लक कारणावरून पती आणि पत्नीमध्ये वाद होऊ लागले आणि ही प्रकरणं पोलिसांपर्यंत गेलेली आहेत. दरम्यान, वर्क फ्रॉम होममुळे पती आणि पत्नीची चांगलीच पंचायत झाली असून दोघेही नोकरी करणारे असल्यास मुलाला सांभाळायचे कोणी असा प्रश्न उद्भवतो. तसेच यातून झालेली भांडणं, घरगुती हिंसाचार पुढे चालून संसार मोडण्यास कारणीभूत ठरत आहे. अशा अनेक कुटुंबांना समुपदेशन संस्था आणि पोलिसांनी सहकार्य करत त्यांचे संसार विस्कटण्यापासून वाचविले आहेत.
घरगुती हिंसाचारावर समुपदेशन करणे महत्वाचे!
लॉकडाऊन किंवा इतर वेळी घरगुती हिंसाचाराच्या घटना आपल्या आजूबाजूला किंवा स्वतः सोबत घडत असतील, तर घटस्फोट किंवा पोलीस हा शेवटचा पर्याय नाही. महिला सेल किंवा महिला समुपदेशन संस्थेकडून पती आणि पत्नीने समुपदेशन करणे महत्वाचे आहे. अगदी टोकाची भूमिका घेणे अयोग्य आहे. पती आणि पत्नीने एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. दोघांनी एकमेकांना वेळ दिला पाहिजे. या लॉकडाऊन काळात 35 जणांचे समुपदेशन करण्यात आले. यापैकी काहींचे संसार पुन्हा जोडले गेले असल्याचे समुपदेशन करणाऱ्या शुभांगी जोशी यांनी सांगितले आहे.
पोलिसांकडून अनेकांचे संसार वाचविण्यात यश
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे म्हणाले, महिला सेलकडे अनेक महिलांचे अर्ज येतात. यापैकी पती आणि पत्नीला बोलावून समोरासमोर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. यामधून अनेकांचे संसार पुन्हा रुळावर आले आहेत. मात्र, भांडण आणि हिंसाचाराची होण्यामागची कारणे ही किरकोळ आहेत, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.