पुणे - बारामती शहरात एकाच कुत्र्याने २५ जणांचा चावा घेतल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील कसबा, मंडई, कचेरी रोड, शिवाजी चौक, गावडे रुग्णालय, समर्थ नगर या भागात या कुत्र्याने २५ जणांचा चावा घेतल्याची घटना घडली आहे.
हेही वाचा - संतापजनक..! पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; खून करून सावत्र बाप फरार
मागील काही महिन्यांपासून बारामती शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील या मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिका प्रशासनाला सामाजिक संघटनांनी तसेच अनेकांनी व्यक्तिगतरित्या या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लेखी आणि तोंडी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, सुस्त असलेल्या बारामती नगरपालिकेने शहरातील मोकाट कुत्र्यांच्या संबंधी अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे मागील काही महिन्यात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
हेही वाचा - मंत्रालयात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; मुख्यमंत्र्यांची भेट न मिळाल्याने तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी
मागील महिन्यातच शहरातील 19 जणांना कुत्र्याने चावा घेतला होता. यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता. मागील महिन्यातच शहरातील शिवाजीनगर येथील विवाहितेचा कुत्राने चावा घेतल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतरही पालिका प्रशासनाने उपाययोजना न केल्याने आज (शुक्रवारी) पुन्हा एकदा शहरातील 25 जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. सर्व रुग्णांवर बारामती उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. रेबीजसाठी आवश्यक असणारी लस रुग्णालयात उपलब्ध असून रुग्णांची योग्य ती काळजी घेत असल्याची माहिती डॉ. दीपा निगडे यांनी दिली.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीचा खून, संशयित आरोपी फरार
दरम्यान, मोकाट कुत्र्यांमुळे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची पालिका प्रशासनाला सोयरसुतक नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.