पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी मध्यरात्री पासून 10 दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे. यापैकी 5 दिवस कडक लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. तर यादरम्यान, नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करुन ठेवु नये, असे आवाहनही त्यांनी केले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याची घोषणा काल (शुक्रवारी) झाली. यानंतर नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी दुकानांमध्ये झुंबड करत गर्दी केली आहे. लॉकडाऊनला तीन दिवस अवधी आहे. यामुळे पाच दिवसांसाठी आवश्यक असलेल्याच वस्तू नागरिकांनी घ्याव्यात, असे आवाहन मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.
हेही वाचा - राज्यात ७ हजार ८६२ कोरोनाबाधित; २२६ मृत्यू
ते म्हणाले, लॉकडाऊनची घोषणा झाली आहे. मात्र, अनेक नागरिकांमध्ये संभ्रम आहे की हा लॉकडाऊन कशा स्वरुपाचा असणार आहे. याविषयीची सविस्तर माहिती, सूचना याबाबत रविवार किंवा सोमवारी सांगण्यात येईल. लॉकडाऊनचा जुना अनुभव लक्षात घेता जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये. गर्दी होणार नाही, फिजिकल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करावे. तीन दिवस अवधी आहे या दिवसांमध्ये 5 दिवस आवश्यक असलेल्या गोष्टी घ्याव्यात.
लॉकडाऊन होणार आहे म्हणून नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी झुंबड करू नये. हा लॉकडाऊन दीर्घ काळ असणार नाही, 5 दिवसांचा कडक लॉकडाऊन असेल. या कालावधीत लागणाऱ्या वस्तूच घेऊन ठेवाव्यात. जीवनावश्यक वस्तूचा साठा करू नका, असे आवाहनही आयुक्त हर्डीकर यांनी यावेळी केले.