पुणे - आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे २५ जूनला पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. गेल्या २ महिन्यापासून पालखी सोहळ्याची तयारी सुरू होती. सोहळ्यातील नियोजनामुळे आळंदी ते पंढरपूर दरम्यानच्या प्रवासात एक आगळवेगळ वैभव पाहायला मिळते.
सुई दोऱ्यापासून ते जेवणाच्या साहित्यापर्यंत भजन कीर्तन हिशोबाच्या वह्या असे सारे साहित्य एकत्रित करून आषाढी वारीच्या ताफ्यात घेतले जाते. अगदी क्रमवारीनुसार प्रत्येक आठवड्याला नावानुसार क्रमवरी लावण्यात येते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये असणारे सेवेकरी व मुख्य चोपदार असे सर्वांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी लागणारे साहित्य व माऊलींच्या नैवेद्याची व्यवस्था करण्यासाठीच्या या सर्व वस्तू आळंदी देवस्थानामार्फत तयार करून ठेवण्यात आल्या आहेत. पालखी प्रस्थानानंतर या सर्व वस्तू प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी नेल्या जातात.
२५ जूनला (मंगळवारी) दुपारी ४ वाजता माऊलींच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. आत्तापासूनच वारकरी आळंदीत येण्यास सुरुवात झाली आहे. इंद्रायणीचा काठ वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला आहे. या सोहळ्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.