पुणे - उजनी धरणाचे पाणी पुणे जिल्ह्यातील इंदापूरला देण्याला सोलापूरमधील शेतकऱ्यांचा विरोध आहे. या संदर्भात आज पुण्यात सोलापूरचे पालकमंत्री आणि जलसंपदा राज्यमंत्री असलेल्या दत्ता भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी बैठकीसाठी आलेले सोलापूरचे शेतकरी, तसेच इंदापूरचे शेतकरी हे पालकमंत्री भरणे यांच्या समोरच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
हेही वाचा - पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजगूनगरच्या शाखेस कोरोनाचा विसर
सोलापूर जिल्ह्यातील उजणी धरणाचे पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यावरून हा वाद आहे. उजनी धरणाचे 5 टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र याला सोलापूरच्या शेतकऱ्यांनी विरोध केला. जलसंपदा राज्यमंत्री असलेले दत्ता भरणे हे इंदापूरचे आमदार आहेत, तर सोलापूरचे पालकमंत्री आहेत. उजनीचे पाणी देण्यावरून सोलापूरच्या शेतकऱ्यांमध्ये जी नाराजी आहे, ती दूर करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती, मात्र बैठकीदरम्यानच दत्ता भरणे यांच्यासमोरच सोलापूर आणि इंदापूरच्या शेतकऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी पहायला मिळाली.
शेतकऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न
दत्ता भरणे यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. सोलापूरच्या शेतकऱ्यांचा पाण्याचा एक ठिपका पण घेणार नाही, मात्र इंदापूरच्या शेतकऱ्यांना देखील पाणी कमी पडू देणार नाही, असे सांगत जर सोलापूरचे पाणी इंदापूरला नेतो आहे, हे सिद्ध करून दाखवले तर मंत्रिपदाचा, आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेईल, असे वक्तव्य दत्ता भरणे यांनी केले.
..तर उपमुख्यमंत्र्यांना किंमत मोजावी लागेल
पुणे जिल्ह्यातील शेवटचा तालुका असलेल्या इंदापूरच्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असे देखील भरणे म्हणाले. तर या बैठकीत आमचे समाधान झालेले नाही, जर उजनीचे थेंब भरही पाणी नेले तर पालकमंत्री दत्ता भरणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा सोलापूरच्या शेतकऱ्यांनी दिला.
हेही वाचा - कोरोना रुग्ण कमी न होणाऱ्या गावांचा 'हाय अलर्ट' गावांमध्ये समावेश