पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये कामावरून काढून टाकल्याच्या रागातून ड्रायव्हरने मालकाची क्रेटा आणि इनोव्हा गाडी पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. यात तब्बल 22 लाखांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी भोसरी MIDC पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद किसनराव भस्के आणि अंकित किसनराव भस्के अशी आरोपींची नावं आहेत. यातील विनोद हा ड्रायव्हर म्हणून काम करत होता.
ड्रायव्हर स्विफ्ट घेऊन गेला होता गावाकडे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामावरून काढून टाकल्याच्या रागातून ड्रायव्हर विनोदने मालकाच्या महागड्या गाड्यांना पेटवून दिल्याची घटना घडली. विनोद काही वर्षांपासून फिर्यादीकडे काम करत होता. तो मध्यंतरी मालकिणीची स्विफ्ट गाडी गावी घेऊन गेला होता. ती, परत न आल्याने मालकीण चिडली होती. त्याच्या घरी जाऊन त्याला जाब विचारणार तेवढ्यात त्याचा भाऊ अंकितने त्यांच्याशी वाद घातला. काही दिवसांनी स्विफ्टचे नुकसान करून परत आणून दिली, असं फिर्यादीत म्हटलं आहे.
कामावरून काढून टाकल्याच्या रागातून गाड्या पेटवल्या
या सर्व प्रकारानंतर विनोदला कामावरून काढून टाकण्यात आले. मात्र, याच रागातून भावाला सोबत घेऊन विनोदने मालकीण राहत असलेल्या सोसायटीमध्ये जाऊन क्रेटा आणि इनोव्हा या महागड्या गाड्या पेटवून दिला, असं तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी भोसरी MIDC पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - 'मोदी है तो मुमकीन है'; सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा मोदींची स्तुती