पुणे - कोरोना झपाट्याने वाढत असताना सध्या चार हजारांहून अधिक कोरोना रुग्णांना प्लाझ्माची गरज भासत आहे. मात्र, प्रत्यक्षात फक्त 200 रुग्णांना पुरेल इतकाच साठा उपलब्ध असल्याची बाब समोर आली आहे. काही कोरोनामुक्त दाते किचकट प्रक्रियेमुळे प्लाझ्मादानासाठी पुढे येत नाहीत, तर काही दात्याकडून थेट पैशांची मागणी होत आहे. त्यामुळे 'कुणी प्लाझ्मा देतं का प्लाझ्मा? अशी म्हणण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे.
पुणेकर कुठल्याच बाबतीत मागे नसतात याचा प्रत्यय वेळोवेळी पाहायला मिळतो. मात्र, सध्या गरज भासत असलेल्या प्लाझ्माच्या बाबतीत पुणेकर मात्र चार पावले मागेच राहिले आहे. शहरात कोरोनाबधिताची संख्या सव्वा लाखाच्या घरात पोहोचली आहे. त्यात कोरोनामुक्त झालेल्याची संख्या 1 लाखांच्या वर गेली आहे. दुसरीकडे शहरात प्लाझ्माची मागणी गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. त्या तुलनेत उपलब्धता कमी आहे. कोरोनाचे रुग्ण बरे झाल्यानंतर प्लाझ्मादान करण्यासाठी फारसे कोणी पुढे येत नाही आहे. शहराची कोरोनाच्या बाबतीत परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
पुणे शहरात दररोज 1 हजार 500 ते 2 हजार कोरोना रुग्ण सापडत आहेत. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे रोजच्या आकडेवारीनुसार रुग्ण बरेही होत आहेत. पुणे शहरात 961 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 520 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत 3 हजार 373 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. शहराची अशी परिस्थिती असताना कोरोनाने आत्तापर्यंत 1 लाख 21 हजार 176 जणांनी कोरोनावर मात केली आहे. इतक्या जणांनी कोरोनावर मात केली असताना दाते प्लाझ्मासाठी पुढे येत नाही आहेत. शहरात दिवसभरातून फक्त 10 ते 12 दाते पुढे येत आहेत. काही रक्तपिढ्या कोरोनामुक्त दात्यांना फोन करतात तेव्हा त्या दात्यांकडून पैशांची मागणी होत आहे.
दरम्यान, शहरात 1 लाख 21 हजार 176 जणांनी कोरोनावर मात केलेली असताना काही रक्तपेढ्यांना दात्यांचा शोध घ्यावा लागत आहे. रुग्णालयातील कोरोनामुक्त कर्मचाऱ्यांनाच प्लाझ्मादान करण्यासाठी पुढे आणावे लागत आहे. उपचारांसाठी पुण्यात येणाऱ्या रुग्णांचा ताण वाढला, तशी प्लाझ्माचीही मागणी वाढली आहे. लोणावळा, शिरूर, शिरवळ, बारामती तसेच अन्य जिल्ह्यांतूनही प्लाझ्माची मागणी होत आहे.
शहरात सुमारे तीन हजार रुग्णांना प्लाझ्माची गरज आहे, असे गृहीत धरल्यास मोठ्या प्रमाणात तुटवडा होत असल्याचे निरीक्षण जाणकारांनी नोंदवले आहे. त्यामुळे प्लाझ्मा दान करण्याची सक्ती करावी, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनाने प्रत्येकाला जगणे शिकवले आहे. आपण प्रत्येक जण समाजाचे काहीतरी देणे लागतो. त्यामुळे प्रत्येक कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान न घाबरता केले पाहिजे. काहींना वाटते आहे की, प्लाझ्मासाठी दिवस जातो तर असे नाही. अतिशय सोपी आणि न त्रास होणारी प्रक्रिया आहे. आपल्यामुळे जर 3 जणांचा जीव वाचत असेल तर यापेक्षा मोठा पुण्य कोणतेच नाही. प्लाझ्मा दान करणे म्हणजे सामाजिक कर्तव्य असल्याची भावना प्लाझ्मा दान करणारे व्यक्ती समजत आहेत.
पुणे शहरात बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 85 टक्के आहे. रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण हे कोरोनामुक्त होत आहेत. असे असताना पुणे शहरात प्लाझ्मासाठीही पुणेकरांनी पुढे येणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही आहे. पुणेकरांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करावे. यामुळे तीन जणांचे जीव वाचेल, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.