पुणे - विविधरंगी फुलांची सजावट, रांगोळी व गालिचा आणि आकर्षक रंगातील पणत्यांसह दिव्यांची आरास, अशा मंगलमय व प्रसन्न वातावरणात सारसबागेजवळील श्री महालक्ष्मी मंदिर उजळून निघाले. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हजारो दिव्यांच्या प्रकाशाने तेजोमय झालेले मंदिर पाहण्यासोबत देवीचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली. श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ११ हजार पणत्यांचा दीपोत्सव मंदिरामध्ये करण्यात आला.
देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या महिला विविधरंगी वेशभूषेत दीपोत्सवात सहभागी झाल्या होत्या. फुले, पणत्यांचे दिवे अशा सर्व पर्यावरणपूरक गोष्टी वापरून दीपोत्सव साजरा करण्यात आला. मंदिरातील प्रत्येक खांबाला फुलांच्या माळा व मंदिर परिसरात विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती. प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, पर्यावरण संवर्धनाबद्दल समाजातून नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. मात्र, त्यासाठी पुढाकार घेण्यात आपण नेहमीच मागे राहतो. प्रत्येकाने स्वत:पासून जर पर्यावरण रक्षणाची जबाबदारी उचलण्यास सुरूवात केली, तर परिवर्तन नक्कीच दिसून येईल. त्यामुळेच मंदिरामध्ये पर्यावरणपूरक गोष्टी वापरून दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा - Flower garden : जाणून घ्या भारतातील पहिल्या मिरॅकल गार्डन विषयी.....